राजकोट – गुजरातमध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यास गोपालन करणाऱ्यांसाठी प्रत्येक गायीसाठी दिवसाला चाळीस रुपयांचा देखभाल खर्च गुजरात राज्याकडून दिला जाईल अशी नवी योजना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तेथील नागरिकांना सादर केली आहे.
गुजरात मधील हिंदु मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे आश्वासन दिले असावे असे मानले जात आहे. ते म्हणाले की, दिल्लीत गायी पाळणाऱ्यांसाठी अशी दैनंदिन मदत दिली जाते. तीच योजना गुजरातमध्येही लागू केली जाईल.
भटक्या जनावरांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पांजरपोळ स्थापन केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. भाजपच्या विद्यमान राज्य सरकारने राज्यातील पांजरपोळ चालकांकडे साफ दुर्लक्ष केल्याने हे चालक राज्य सरकारच्या विरोधात सध्या आंदोलन करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
गुजरात मधील ज्या रिक्षाचालकाने केजरीवालांना भोजनासाठी बोलावले होते, त्याने आपण मोदी समर्थक असल्याचे म्हटले होते. त्या विषयी विचारले असता केजरीवाल म्हणाले की, भाजप किंवा कॉंग्रेस कोणत्याही पक्षाचे समर्थक मला जेवायला बोलावू शकतात.
त्यांनी कोणत्याही पक्षाला मतदान करावे पण मला जेवायला बोलवावे असे नर्म विनोदी शैलीत त्यांनी नमूद केले. आपले सरकार राज्यात सत्तेवर आले तर कोणताहीं राजकीय भेदभाव न करता सर्वच नागरिकांच्या हितासाठी आम्ही काम करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.