India vs South Africa – भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवच धावांचा पाऊस पाडण्याचं काम कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने पुन्हा एकदा जबरदस्त खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावा केल्या आहेत. मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या प्रत्येक भारतीय फलंदाजाने शानदार खेळी केली. भारताकडून केएल राहुलने ५७ धावा, कर्णधार रोहित शर्मा ४३, विराट कोहली नाबाद ४९, तर दिनेश कार्तिकने ७ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने २२ चेंडूंत ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. विराटसोबत दमदार फलंदाजी करत असताना तो धावबाद झाला. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १००० धावाही पूर्ण केल्या. याशिवाय त्याने सर्वात कमी ५७३ चेंडूत १००० धावा पूर्ण करणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे.
Milestone 🚨 – @surya_14kumar becomes the fastest batter to get to 1000 T20I runs in terms of balls (573) faced.#TeamIndia pic.twitter.com/iaFgAX8awu
— BCCI (@BCCI) October 2, 2022
आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. केएल राहुलनेही टी-२० क्रिकेटमध्ये १८ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने २००७ साली इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते.