लखनौ – सन 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या सर्व 80 जागा जिंकण्याचे भाजप पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये जिंकू न शकलेल्या 14 जागांसाठी आम्ही विशेष रणनीती आखली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील रायबरेली आणि मैनपुरी या दोन्ही महत्त्वाच्या जागांवरही आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे असे ते म्हणाले. राज्यात भाजप आणि बहुजन समाज पक्षात छुपी युती असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे.
मैनपुरी हा मतदार संघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो येथून सध्या त्या पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव हे खासदार आहेत. तर रायबरेली हा कॉंग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असून तेथून सोनिया गांधी लोकसभेवर निवडून येत आहेत.
यादव म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 64 जागा जिंकल्या, आणि 16 जागा गमावल्या. पोटनिवडणुकीत आम्ही रामपूर आणि आझमगड जिंकलो. आत्तापर्यंत, 14 जागा आमच्याकडे नाहीत. रायबरेली आणि मैनपुरीदेखील त्यापैकी आहेत.
ते म्हणाले, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने याआधी गमावलेल्या जागांसाठी विशेष रणनीती आखली आहे. या मतदार संघांमध्ये केंद्रीय मंत्री भेट देत आहेत आणि तिथेच थांबत आहेत. पक्षाला या सर्व जागी यश मिळेल आणि सर्व 80 जागा जिंकू असा दावा आज त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.