Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचा पाय आता खोलात जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.कारण त्यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ म्हणजेच लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. कारण हिरानंदानी ग्रुपकडून या प्रकरणी आता लोकसभेत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभेच्या आचार समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केले असून संबंधित प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी दावा केला की, महुआ मोईत्रा (Mahua Moitra)यांनी त्यांचे संसदेचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड त्यांना प्रदान केले आहे. या लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून ते स्वत: आवश्यकतेनुसार मोईत्रा यांच्या वतीने थेट लोकसभेत प्रश्न उपस्थित करू शकत होते.
तर दुसरीकडे खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी हे पत्र हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. संबंधित पत्राचा मसुदा (ड्राफ्ट) पंतप्रधान कार्यालयाने पाठवला असून त्यावर दर्शन हिरानंदानी यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचे मोईत्रा यांनी म्हटले आहे.
हिरानंदानी यांनी गुरुवारी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात,“महुआ मोईत्रा यांनी अदाणी समूहाला लक्ष्य करून सरकारला अडचणीत आणतील, असे काही प्रश्न तयार केले होते. जे प्रश्न त्या संसदेत उपस्थित करू शकतील. त्यांनी संसद सदस्य म्हणून त्यांचा ईमेल आयडी मला दिला होता. जेणेकरून मी त्यांना माहिती पाठवू शकेन आणि त्या थेट संसदेत प्रश्न मांडू शकतील.”
“याशिवाय महुआ मोईत्रा यांनी मला अदाणी समूहावरील हल्ल्यांमध्ये पाठिंबा देत राहण्याची विनंती केली आणि त्यांनी मला संसदेचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्रदान केला, जेणेकरून आवश्यक असेल तेव्हा मी थेट त्यांच्या वतीने प्रश्न पोस्ट करू शकेन,” असंही दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.
गुरुवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करत मोईत्रा (Mahua Moitra)म्हणाल्या, “दर्शन हिरानंदानी यांना त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. उद्योगविश्वातून त्यांना संपवलं जाईल, अशी धमकी आली. त्यांच्या कंपन्यांवर सीबीआय छापे टाकेल आणि सर्व सरकारी व्यवसाय बंद केले जातील. तसेच सर्व PSU बँक वित्तपुरवठा ताबडतोब बंद केला जाईल, अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.”
“तीन दिवसांपूर्वी (१६ ऑक्टोबर) हिरानंदानी ग्रुपने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. आज (गुरुवारी) एक प्रतिज्ञापत्र प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाले. हे प्रतिज्ञापत्र लेटरहेड नसलेल्या एका पांढर्या कागदावर आहे,” असंही मोईत्रा यांनी निदर्शनास आणून दिले.