नगर -वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023स्पर्धेसाठी केडगाव देवी रोड येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणीचे मैदान पूजन ज्येष्ठ पैलवान महादेव अण्णा कोतकर यांच्या हस्ते झाले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी यात्रेनिमित्त रविवारी (दि. 22) या जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी गटातील माती व गादी विभागातील विजयी मल्लांना 2 किलो चांदीची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
प्रारंभी हनुमानाच्या प्रतिमेस अभिवादन करून मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर निवड चाचणीच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, आयोजक पै. हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक संग्राम शेळके, पै. श्यामभाऊ लोंढे, विजय पठारे, पै. संतोष कोतकर, पै. संग्राम कोतकर, खजिनदार पै. नाना डोंगरे, कार्याध्यक्ष, पै. अजय अजबे, उद्योजक अभिजित कोतकर, ऍड. वैभव कदम, पै. अंगद महानवर, राजू कोतकर, विठ्ठल महाराज कोतकर, सूर्यभान नांगरे आदी उपस्थित होते.
पै. हर्षवर्धन कोतकर म्हणाले की, केडगावला महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी घेण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. गादी-माती विभागात ही स्पर्धा होणार असून, पाचशेपेक्षा जास्त मल्ल या स्पर्धेत उतरणार आहेत. या वेळी पै. लांडगे आणि डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
नामवंत मल्ल-वस्ताद राहणार उपस्थित
राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे धाराशिव (उस्मानाबाद) येथे 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ पाठविण्यासाठी केडगावला आखाडा तयार करण्याचे काम सुरू आहे. दीड ते दोन हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी मैदानात सोय केली जाणार आहे. गादी व लाल मातीच्या आखाड्याचे काम सुरू आहे. रविवारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत कुस्त्या चालणार आहे. या स्पर्धेस लाल मातीतून सिनेसृष्टीत गेलेले पै. अमोल लंके व महाराष्ट्रातील मल्ल व वस्ताद उपस्थित राहणार आहेत.