महेंद्रसिंग धोनीवर अन्याय झाला

निवड समितीचे माजी सदस्य शरणदीप यांना लागला शोध

नवी दिल्ली – निवड समितीच्या पदावरून निवृत्त झाले की सगळ्या माजी सदस्यांना कंठ फुटतो. याचेच आणखी एक उदाहरण आता शरणदीपसिंगनेही तेच गाणे गायले आहे. 2020 साली पदावरून बाजूला झालेल्या शरणदीपने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर अन्याय झाल्याचे वक्‍तव्य केले आहे. खरेतर धोनीला टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्याची इच्छा होती; मात्र, त्यावेळी धोनीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे मत शरणदीप यांनी व्यक्‍त केले असून त्यावर नेटकऱ्यांनी शऱणदीपवर चांगलेच ताशेरे मारले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीचा निर्णय धक्‍कादायक होता. 2019 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर विश्रांती घेत धोनीने जवळपास एक वर्ष क्रिकेट खेळले नव्हते. त्यावेळी तो टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळेल अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात होता. मात्र, अमिरातीतील आयपीएल स्पर्धेपूर्वीच त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्‍का दिला.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे तत्कालीन सदस्य शरणदीपसिंग यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. निवड समितीची इच्छा होती की धोनीने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळावी. तो नव्या खेळाडूंपेक्षाही काकणभर जास्त फिट होता. ही स्पर्धा ऑक्‍टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार होती. पण करोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्याचवेळी धोनीने निवृत्ती घेतली. तो आणखी एक वर्ष वाट पाहू शकत नव्हता. त्याच वेळी त्याने आणखी काही वर्ष आयपीएल खेळणार असल्याचे जाहीर केले.

मात्र, धोनीने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळली पाहिजे असे माझे मत होते, त्यावेळी निवड समितीतील अन्य काही सदस्यांनी धोनीच्या विरोधात मत व्यक्‍त करत नवोदितांना संधी देण्यावर भर द्यायचे ठरवले. धोनीने देशाला इतक्‍या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले आहे त्यामुळे ही संधी त्याला मिळायला हवी होती, असे शरणदीप यांनी सांगितले.

शरणदीप यांची निवड समितीमधील मुदत 2020 मध्ये संपली. त्यांची मुदत संपल्यावर त्यांना हा शोध कसा लागला. त्याचवेळी त्यांनी आपले मत समितीच्या बैठकीत ठामपणे का सांगितले नाही तसेच त्याचवेळी अन्य सदस्यांनी धोनीला विरोध केल्याचे जाहीरपणे का सांगितले नाही, अशी विचारणा सोशल मीडियावर चाहत्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.