पुणे – महापालिकेकडून शहरात प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जातात. या कामांचा दर्जा तपासण्यासाठी प्रत्येक कामाचे थर्डपार्टी ऑडीट केले जाते. मात्र, अनेक कामांमध्ये हे थर्डपार्टी ऑडीटच मॅनेज करून निकृष्ट कामांची बिले दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या थर्ड पार्टी ऑडीटचीही महापालिकेकडून स्वतंत्र तपासणी होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले असून या कक्षासाठी एक कार्यकारी अभियंता, दोन उपाभियंता तसेच पाच कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. तर, या कक्षाची जबाबदारी महापालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे असणार आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय तसेच मुख्य खात्याकडून शहरात दरवर्षी सुमारे हजार कोटींची भांडवली कामे होतात. त्यात, बहुतांश कामे क्षेत्रीय कार्यालयांकडून तसेच नगरसेवकांच्या “स’ यादीतून केली जातात. या कामांचा दर्जा तपासण्यासाठी महापालिकेकडून थर्डपार्टी ऑडीट केले जाते.
मात्र, या ऑडीटसाठीचा खर्च यापूर्वी ठेकेदारांनी करणे बंधनकारक होते. त्यामुळे ठेकेदारांकडून हे ऑडीट मॅनेज करून निकृष्ट तसेच चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असल्याचे काही प्रकार समोर आले होते. त्यानंतर, ही बाब लक्षात येताच महापालिकेने थर्ड पार्टी ऑडीटचा खर्च पूर्वगणकपत्रातच नमूद करून तो महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यानंतरही अनेक कामांच्या बाबतीत तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे चुकीच्या पद्धतीने कामे झालेली असतानाही थर्ड पार्टी ऑडीटमध्ये या चुकांकडे अक्षम्य दुलर्क्ष करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पालिकेने आता या थर्ड पार्टी ऑडीटचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून या कक्षासाठी कक्ष प्रमुखांसह आठ जणांची नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे.