-->

#Cricket : रणजी रद्द झाल्याने खेळाडू संकटात

मुश्‍ताक अली वगळता देशांतर्गत एकही मोठी स्पर्धा नाही

पुणे – बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आता गंभीर परिणाम दिसणार आहेत. देशातील 38 संघात ही स्पर्धा होते व त्यात जवळपास 750 खेळाडू खेळतात. आता ही स्पर्धाच होणार नसल्याने या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी तर मिळणारच नसून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसानही होणार आहे. अर्थात, याबाबत बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने बोलण्यास नकार दिला आहे.

करोनामुळे स्पर्धेला मुळातच उशिर झाला होता. बायोबबल वातावरणात विविध राज्य संघटना स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत नसल्यानेच ही स्पर्धा रद्द करण्यात आली. मात्र, टी-20 मुश्‍ताक अली स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरुवात झाली होती व ती स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. आता बीसीसीआय एकदिवसीय स्पर्धा, महिला वरिष्ठ गट एकदिवसीय स्पर्धा व 19 वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

भारत वगळता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजमध्ये प्रथम श्रेणी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. मात्र, भारतात अद्याप मुश्‍ताक अली वगळता एकाही मोठ्या देशांतर्गत स्पर्धेला प्रारंभ झालेला नाही.

लाखो रुपयांचे नुकसान..

ही स्पर्धा जरी रद्द झाली असली तरीही विविध राज्य संघटनेच्या खात्यांवर जमा होणारे नुकसानभरपाईचे पैसे खेळाडूंना वितरित करणार का, हा प्रश्‍न कायम आहे. प्रथम श्रेणी स्पर्धा न झाल्याने 38 संघांतील खेळाडूंना जवळपास 15 लाखांचे नुकसान होणार आहे. प्रत्येक संघात 20 खेळाडू असतात. म्हणजे जवळपास 750 खेळाडूंवर त्याचा परिणाम होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.