अहमदनगर – छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक 21 ते 23 एप्रिलदरम्यान अहमदनगरच्या वडियापार्क मैदानावर आयोजित करण्यात आली होती. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले होते. तसेच महाराष्ट्र केसरी 2023 चा विजेता शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, महेंद्र गायकवाड अशा दिग्गज मल्लांनी देखील सहभाग नोंदविला होता.
काल दि. 23 एप्रिल रोजी या कुस्ती स्पर्धेची अंतिम कुस्ती महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे असा खेळवली गेली. ही अंतिम कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली होती. दोन्ही मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही अंतिम कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात चांगलीच धरपकड सुरू होती.
अखेर महेंद्रच्या मजबूत पकडीनंतर अचानक त्रास झाल्याने शिवराज जखमी झाला. शिवराजला गंभीर त्रास होत असल्याचं समजताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर आयोजकांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले.
दरम्यान, हि कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवराय केसरीचा विजेता महेंद्र गायकवाड याला 35 लाख रुपये किमतीची अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस देण्यात आली आहे.