Maharashtra ST Bus : राज्यातील लालपरीची म्हणजेच एसटी महामंडळाच्या (Maharashtra ST Bus) ताफ्यात नव्या 2200 गाड्या दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटीकडून इतिहासात पहिल्यांदाच गाड्या बाहेरुन बनवून ताफ्यात सामील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोडकळीस आलेल्या एसटी (Maharashtra ST Bus) बसचा होत असलेला वापर आणि त्यावरून महामंडळावरील टीका यामुळे एसटीची प्रतिमा मालिन झाली होती. त्यातच सुधारणा करण्यासाठी एसटी महामंडळाकडून खासगी कारखान्यांमध्ये बांधणी करत तात्काळ गाड्या आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एसटी महामंडळाकडून वर्कशॉपऐवजी गाड्या बाहेरुनच बांधणी करण्यात येत आहे.
येत्या काही दिवसात यातील पहिला लॉट दाखल होणार आहे. या सर्व गाड्या एसटीच्या मालकीच्या असणार आहे. या नव्या गाड्यांसाठी आधीच बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्या लवकर दाखल झाल्या असत्या मात्र एका बड्या कंपनीकडून निविदा चुकीचं भरल्याने मोठा अवधी गेला. अशात ‘त्या’ बड्या कंपनीचं पाच कोटींचं डिपॉझिट महामंडळाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून घोषणा केलेल्या पाच हजार इलेक्ट्रीक बसेस आणि एलएनजीवरील गाड्या येण्यास बराच अवधी जाणार असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तसेच एसटीच्या (Maharashtra ST Bus) खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असून त्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.
तीन बड्या कंपन्यांच्या गाड्या दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या (Maharashtra ST Bus) ताफ्यात 10 वर्षांहून अधिक काळ झालेल्या गाड्यांची संख्या जवळपास साडे नऊ हजार इतकी आहे. एसटीची मासिक तूट 24 कोटींवर आली आहे, जी आधी 200-250 कोटी रुपये होती . येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ नफ्यात येण्याचा अंदाज आहे.