पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी (दि.16 जुलै) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील व त्याची प्रिंटही घेता येईल.
निकालाची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी ट्विट करून दिली. तसेच राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावर्षी प्रथमच करोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. परिणामी इयत्ता नववीचा अंतिम निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे.
दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शासनाने 12 मे रोजी ही परीक्षा रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 28 मे रोजी दहावीसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
त्यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुली आहेत. दरम्यान, दहावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक-दोन संधी उपलब्ध राहतील, असेही डॉ. भोसले यांनी म्हटले आहे.
10 वी : निकाल पाहता येणार निकाल कुठे पाहणार?
सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021)
-निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
-त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
-त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
-त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
-यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
-निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.