सातारा – ग्रामपंचायतींकडील 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याजाच्या रकमेतून सातारा जिल्हा परिषदेने 31 रुग्णवाहिकांची खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.16) सकाळी 11 वाजता अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव गेल्या सव्वा वर्षांहून अधिक काळ आहे. जिल्हा प्रशासन या संकटाचा सामना मोठ्या धीराने करत आहे. या संकटात आरोग्याच्या सुविधांची कमतरता भासू लागली. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी आल्या.
या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदीची गरज ओळखून शासनाकडे त्याबाबत मागणी केली.
त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याजाच्या रक्कमेमधून सातारा जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या मान्यतेनुसार 31 रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली असल्याचे फडतरे यांनी सांगितले.
या रुग्णवाहिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लोकसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यासाठीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 11 वाजता अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. करोना नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फडतरे यांनी केले आहे.