पणजी :- ‘ह्या वेळी 200 पार’ या निर्धाराने उतरलेल्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर मंगळवारी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील पदकांचे ऐतिहासिक दविशतक साकारले. महाराष्ट्राच्या युवा शिलेदारांच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे राज्याची शान देशभरात उंचावली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी 13व्या दिवशी प्रामुख्याने ट्रायथलॉन, कबड्डी, कयाकिंग या क्रीडा प्रकारांत पदके मिळाली.
Maharashtra soars to historic heights, clinching 203 medals and securing the first-place position in the National Games as of November 7th. Crossing the 200-medal mark, our athletes have etched their names in history. 🥇@Nat_Games_Goa @BansodeSpeaks#TeamMaharashtra #GetSetGoa pic.twitter.com/qQxRebuC66
— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 7, 2023
पदकतालिकेतील अग्रस्थानावर पहिल्या दिवसांपासून विराजमान असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यावर 70 सुवर्ण, 64 रौप्य, 69 कांस्यपदकांसह एकूण 203 पदके आहेत. सेनादल (55 सुवर्ण, 24 रौप्य, 33 कांस्य, एकूण 112 पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (50 सुवर्ण, 41 रौप्य, 54 कांस्य, एकूण 145 पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत.
ट्रायथलॉन शर्यतीमधील मिश्र रिले विभागात महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले आहे. महिलांच्या वैयक्तिक विभागात याआधी सोनेरी यश मिळवणाऱ्या मानसी मोहितेचे या पदकातही महत्त्वाचे योगदान होते. कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून 29-39 असा पराभव पत्करल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कयाकिंग शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवी रायकवारने कांस्यपदकाची कमाई केली.
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी अनुक्रमे केरळ आणि कर्नाटकचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी महाराष्ट्राचे दोन्ही संघ ओडिशाशी सुवर्णपदकासाठी झुंजतील. हॉकीमध्ये अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे सुवर्णस्वप्न भंगले. कर्नाटकने 5-4 असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. बीच हँडबॉल क्रीडा प्रकारातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने केरळविरुद्ध 9-11,10-13 असा निसटता पराभव पत्करला. नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. ज्युदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला दोन कांस्यपदकांची हुलकावणी मिळाली.
अतिशय ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी!
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदकांचा टप्पा पार केला, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी आहे. आमच्या खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांनी गेले काही महिने जे परिश्रम घेतले आहेत, त्याचेच हे प्रतिक आहे, असे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध खेळांच्या राज्य संघटना यांनी या स्पर्धांसाठी अतिशय मनापासून तयारी केली होती. माजी आंतरराष्ट्रीय स्मिता शिरोळे यादव यांच्याकडे पथकप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वच महिला खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळाली होती. आता आमचे उत्तराखंड मिशन असून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोनशे पदकांची कमाई ही उत्तम पायाभरणी आहे.”