Maharashtra Rain – राज्यभरात आज बाप्पाला निरोप दिला जात आहे ( Ganpati Visarjan). मोठ्या जल्लोषात श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीत सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. वरूणराज्याच्या उपस्थितीत बाप्पाची विसर्जन मिरवणुक सुरु आहे. पुणे शहरासह राज्यातील विविध भागात पावसाने आज हजेली लावली.
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार विविध भागात चांगला पाऊस पडत आहे.आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टीवरील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या मराठवाड्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम, आंध्र प्रदेशसह केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.नैऋत्य मोसमी मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.