मुंबई, दि. 29 – केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉक ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 6 साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत अनलॉक 5 मधील गाईडलाईन्स 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
राज्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी साथीचे संकट कायम आहे. पुढील काही दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केलेली असल्याने राज्य सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेत 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून “मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये मुंबईतील लोकल सेवेसह राज्यातंर्गत रेल्वे सुरू करण्यास परवानगी देत लॉकडाउन 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवला होता. आता ऑक्टोबरमध्ये त्यांची मुदत संपल्याने पुन्हा एकदा 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढवली आहे. कोविड नियम पाळून 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक 5 मध्ये, थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आली होती. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत.
मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्याच्या काही विशिष्ट प्रसंगांमध्ये काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य आणि सुरक्षिततेच्या खबरदारीबाबत कार्य पद्धतीचे पालन अनिवार्य आहे. यामध्ये मेट्रो, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळे, योग आणि प्रशिक्षण संस्था, चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क यांचा समावेश आहे.