सातारा – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत मल्ल आणि कुस्तीशौकिन यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यंदाची 64 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारला घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 4 ते 9 एप्रिल अखेर श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे स्पर्धा रंगणार आहे. पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये पार पडलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्याला 1962 नंतर मिळाला बहुमान
सातारला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आँलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा वारसा लाभलेल्या जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होत आहे ही जिल्ह्यातील कुस्तीशौकिनाच्या द्रुष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. 1962 साली सातारला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती त्यानंतर तब्बल 60 वर्षानंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला यजमान पदाचा बहुमान मिळाला आहे.
आज पुणे येथे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सर्जेराव शिंदे,गणेश कोहळे, हनुमंत गावडे , संभाजी वरूटे, दयानंद भक्त, सुरेश पाटिल , तांत्रिक सचिव बंकट यादव, सुनील चौधरी, वामनराव गाते , भरत मेकाले , मुर्लीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे यांच्या उपस्थितीतझालेल्या बैठकीत स्पर्धेच्या कार्यक्रम निश्चित करण्यात आला. सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे 4 एप्रिल ते 9एप्रिल अखेर स्पर्धा होणार आहे. अँमेनोराचे अनिरुध्द देशपांडे स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी (पिंपरी चिंचवड) येथे १८मार्च ते २० मार्च अखेर होणार आहे. मल्लांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.