पुणे – कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983 सालापासून मोहोळ कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार महाराष्ट्र केसरी 2022 गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. मोहोळ यांच्या नवी पेठ येथील निवासस्थानी मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गदेचे पूजन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम अशोक मोहोळ, मामासाहेब मोहोळ संस्थचे विश्वस्त कुणाल सदानंद मोहोळ, अजिंक्य अशोक मोहोळ, समरजीत संग्राम मोहोळ, क्रीडालेखक, पत्रकार संजय दुधाणे, सचिन पवळे आदी उपस्थित होते.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. गेली 38 वर्ष अव्याहतपणे मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करुन मामासाहेब मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.
यंदाची 12 किलोची गदा असून 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा लावून कोरीव कामांची झळाळी गदेला देण्यात आली आहे. गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात आले असून पेशवेकालीन कारागीर पानघंटी ही गदा गेली 38 वर्ष बनवित आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम मोहोळ यांनी तर आभार राष्ट्रीय पंच चंद्रकांत मोहोळ यांनी मानले.