सातारा – यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या राक्षेवाडी (ता. खेड) येथील शिवराज राक्षे व उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. उदयनराजे भोसले यांनी शिवराजचा पगडी आणि चांदीची गदा देऊन सत्कार केला.
महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षे यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यामुळे ठिकठिकाणी शिवराज राक्षे यांचा सत्कार सुरू आहे. शिवराजच्या या यशाची दखल साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. त्यांनी पुण्यात शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांचा सत्कार केला.
मोठ्या स्पर्धांच्या ठिकाणी राजकारण पाहायला मिळतं ते थांबायला हवे. चांगला खेळाडूंना योग्य ती संधी मिळायलाच हवी, त्यासाठी कोणी प्रस्तावना देण्याची गरज नाही, असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. चांगल्या खेळाडूंना राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे तरच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, असेही त्यांनी सांगितले. कठोर मेहनतीच्या जोरावर शिवराजने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. त्याला मनापासून शुभेच्छा, या शब्दांत उदयनराजे यांनी शिवराजचे कौतुक केले.