कात्रज (धिरेंद्र गायकवाड) -पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाकडील दिवे दुरुस्तीच्या हायड्रॉलिक क्रेन 15 वर्षे जुन्या झाल्याने त्यामध्ये सतत बिघाड होत असल्याचे कारण देत दक्षिण पुणे उपनगर परिसर तसेच पालिकेत समाविष्ट गावांतील अनेक पथदिवे तसेच वीजच्या खांबांवरील दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. स्मार्ट सिटी तसेच सुशोभिकरण सारख्या अनावश्यक कामांवर कोट्यवधींचा निधी करणाऱ्या महापालिकेकडे आधुनिक क्रेन खरेदीसाठी निधी नाही का? असा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला आहे.
सहकार नगर, धनकवडी, आंबेगाव पठार, जांभुळवाडी रस्ता, मोरेबाग परिसर नव्याने समाविष्ट जांभूळवाडी कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी या भागातील अनेक पथदिवे दुरूस्ती अभावी बंद आहेत. क्रेन उपलब्ध नसल्याने अशा शेकडो दिव्यांची दुरुस्ती झालेली नाही. धनकवडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत परिसरामध्ये अनेक रस्ते, उपरस्त्यांवरील पथदिवे तसेच विविध उंचीवरील विद्युत कामे अद्यावत हायड्रॉलिक क्रेन उपलब्ध नसल्याने एक-दोन वर्षांपासून करण्यात आलेली नाहीत. यामुळे या भागात सातत्याने अंधार असतो, याबाबत दुरूस्तीची मागणी करूनही विद्युत विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
दरम्यान, नादुस्त क्रेन याबाबत मनपा विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता श्रीनिवास कंदील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
नुसती उधळपट्टी…
“जी-20′ परिषद बैठकीसाठी पुणे शहराची रंगरंगोटी तसेच रोषणाईवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला असताना महापालिका प्रशासनाचे स्वत:च्याच विभागातील अधिकारी, अभियंत्यांच्या मागण्या आणि साधन-सामग्री खरेदीकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका वर्षाला हजारो कोटी रुपये महसूल मिळत असताना विद्युत विभागाला आधुनिक क्रेन उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून टीका होत आहे.
अनेक वर्ष जुन्या झालेल्या हायड्रोलिक क्रेन, कमी क्षमतेच्या असल्याने तसेच जुन्या झाल्याने त्यात बिघाड होत आहे. क्रेनचाच अपघात होण्याची शक्यता असल्याने त्या मोटार वाहन डेपो विभागात जमा करण्यात आल्या आहेत. नव्या अद्यावत हायड्रोलिक क्रेन मागणी साठीचे पत्र वरिष्ठांमार्फत देण्यात आले आहे. सध्या, भाडेतत्त्वावर ठराविक दिवसांकरीता क्रेन मागून कामे करीत आहोत.
– रजत बोबडे, कनिष्ठ अभियंता, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय