मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.
सर्व नागरिकांना आणि विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करण्यात येते की, आपले पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती करून घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाईट्सवर क्लिक करत आहेत, किंवा काय वेबसाईट ब्राऊज करत आहेत यावर लक्ष ठेवा.
तसेच स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा. कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा. तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे, तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा.
जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले की आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर द्यावी.