मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा विस्तार याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळी प्रतीक्षेत असलेल्या आमदारांच्या पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या वेळी शिंदे गटाच्या नाराज आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना यात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची अपेक्षा लावून बसलेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सरकार स्थापनेनंतर आतापर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात दुसऱ्या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटाचे तसेच भाजपचेही आमदार नाराज झाले होते. मात्र, आता या नाराज आमदारांना खूष करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे.
खातेवाटप, पालकमंत्री पदावरही लक्ष
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खातेवापट आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. यावेळी मात्र, विस्तारात चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नात असल्याचे दिसून येते.