पुणे – महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन पुरस्कार विजेते माजी ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला, चेअरमनपदी अॅड. अभय छाजेड, सचिवपदी सतीश उचिल, तर खजिनदारपदी माधव शेजुळ बिनविरोध निवडून आले.
पुण्यात मॅरेथॉन भवन येथे संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. त्यात ही प्रक्रिया पार पडली. ही कार्यकारिणी 2020 ते 2024 या काळासाठी कार्यरत असेल. 1 डिसेंबर रोजी झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणी सभेत 2020 ते 2024 या कालावधीसाठी निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
7 डिसेंबरपर्यंत प्रतिनिधींची नावे मागविण्यात आली होती. 8 डिसेंबर रोजी पात्र सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत पात्र यादीमधून विविध पदांसाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले. 18 डिसेंबर ही अर्ज माघारीची अखेरची मुदत होती. या वेळेपर्यंत निर्देशित पदाइतकीच नावे आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
या सर्वसाधारण सभेला भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी मधुकांत पाठक, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते. सुनील शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी घटनेप्रमाणे सर्व पदांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावे जाहीर केली.
नवी कार्यकारिणी : अध्यक्ष – आदिल सुमारीवाला, चेअरमन – अभय छाजेड. वरिष्ठ उपाध्यक्ष – नारायण खडके, गोपालसिंग राजपूत, संजय बदोले, बलराम पाटील, ललित जिवाणी, संजय पाटील, राजू प्याटी, श्रीकांत जोशी. सचिव – सतीश उचिल. खजिनदार – माधव शेजुळ.
वरिष्ठ सहसचिव – शरद सूर्यवंशी. सहसचिव – सुरेश फरकाटे, पंकज भारसाखळे, दिनेश भालेराव, अतुल पाटील, प्रलोभ कुलकर्णी, अशोक अहेर, हेमंत पांडे.
सदस्य – राकेश सावे, राजीव जोशी, रणजितसिंग राणे, राजीव कुलकर्णी, फुलचंद सलामपुरे, राजेश जाधव, रमेश गंगावणे, सुरेश आडपेवार.