नवी दिल्ली – भाजपने शनिवारी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (MP Vidhansabha election) 92 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यामध्ये विद्यमान आमदार आकाश विजयवर्गीय (Akash Vijayvargiy) यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातील भाजपचे (MP bjp) दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असणाऱ्या कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiy) यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांना पक्षाने याआधीच उमेदवारी दिली. त्यांना इंदूर-1 मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले.
विधानसभा (vidhansabha election) निवडणुकीचे तिकीट दिल्याने विजयवर्गीय यांच्याकडे भाजपने सत्ता राखल्यास मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य चेहऱ्यांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचे पुत्र आकाश यांना रिंगणात उतरवले जाणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले. त्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. मागील निवडणुकीत आकाश इंदूर-3 मतदार संघातून विजयी झाले होते. त्या मतदारसंघात भाजपने राकेश गोलू शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने आणखी काही आमदारांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्या पक्षाच्या ताज्या यादीत 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत 228 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. मध्यप्रदेशात निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 17 नोव्हेंबर यादिवशी मतदान होईल.