Team India, Vice Captain: भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड कप (ODI World Cup-2023) दरम्यान मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंड्याला ही दुखापत झाली होती. त्याला त्याचे षटकही पूर्ण करता आले नाही. दरम्यान, हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार नसल्याचे अपडेट समोर आले आहे. हार्दिक पंड्या या आयसीसी स्पर्धेत संघाचा उपकर्णधारही आहे. अशा परिस्थितीत त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे उपकर्णधारपद कोण सांभाळणार, हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात नक्कीच घोळत आहे.
बीसीसीआयने दिली अपडेट –
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धचा पुढील विश्वचषक सामना खेळू शकणार नाही. गुरुवारी पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला. यानंतर बीसीसीआयने हार्दिकचे स्कॅनिंग केले. तंदुरुस्तीसाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जात आहे. भारताला 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक सामना खेळायचा आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
संघाचा उपकर्णधार कोण होणार?
रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होऊ शकतो. रोहित शर्मा आणि हार्दिकच्या अनुपस्थितीत राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना एक छोटा ब्रेक मिळणार असून 26 ऑक्टोबरला संघाचे खेळाडू लखनऊमध्ये जमतील.
भारत अजूनही हरलेला नाही –
बीसीसीआयचे वैद्यकीय पथक हार्दिक पांड्यावर लक्ष ठेवून आहे. तो धर्मशालाला जाणार नाही आणि आता थेट लखनऊला जाईल जिथे संघाला इंग्लंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारतीय संघ 29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथे इंग्लंड विरुद्ध विश्वचषक सामना खेळणार आहे. महान सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने या आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे.