नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित तरुणीच्या बहिणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी याविषयी माहिती देताना ही घटना १४ जुलै रोजी घडली आहे. दोन बहिणी शाळेतून घरी परतत असताना चार आरोपींनी जबरदस्तीने घरात नेऊन दोघींचा विनयभंग केला. त्यानंतर एका वेगळ्या खोलीत मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. दरम्यान, या धक्क्यातून घरी परतलेल्या पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
भाजप नेत्याच्या मुलासह दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच “आम्ही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून त्यांचे वय तपासत आहोत. आरोपींपैकी एक भाजप नेत्याचा मुलगा असल्याची पुष्टी झाली असली तरी ती आमच्या चिंतेची बाब नाही,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दतियाचे पोलिस अधीक्षक (एसपी) प्रदीप शर्मा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती देताना,“लहान बहिणीने आरोप केला आहे की चार आरोपींनी तिच्या मोठ्या बहिणीला घरी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची प्रकृती सध्या स्थिर असून आम्ही तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहोत, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपचे दतिया जिल्हा युनिट प्रमुख सुरेंद्र बुधोलिया यांनी जर महिलेने पक्षाच्या नेत्याच्या मुलाचे नाव आरोपी म्हणून दिले असेल तर त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.