मुंबई – आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याला गैरवर्तन केल्यामुळे सामना रकमेच्या 20 टक्के दंड करण्यात आला आहे. तसेच बाद झाल्यावर परतत असताना मार्कस स्टोइनिसने आपली बॅट आपटली होती. त्यामुळे त्यालाही समज देण्यात आली आहे. ही त्याची पहिलीच चूक असल्याने त्याला दंड करण्यात आला नाही.
राहुलने आपली चूक मान्य केली आहे. त्याने बीसीसीआयच्या आचारसंहिता नियमाच्या कलम 1 चा भंग केल्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. याआधी मुंबईविरुद्धच्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटसाठी राहुल याला दंड ठोठावण्यात आला होता.
सामन्याच्या 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टोइनिसला जोश हेझलवूडने बाद केले. त्यावेळी त्याने संतापाच्या भरात पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना बॅट जोरात हवेत फिरवून आपटण्याची कृती केली होती. त्यावेळी बेंगळुरूच्या एक खेळाडूला ही बॅट जोरात लागली असती.
बंगळुरू संघाने 18 धावांनी सामना जिंकला
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने 6 गडी गमावून 181 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने 64 चेंडूत 96 धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 23 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावाच करू शकला आणि 18 धावांनी सामना गमावला. कृणाल पांड्याने 28 चेंडूत 42 तर कर्णधार केएल राहुलने 24 चेंडूत 30 धावा केल्या. जोश हेझलवूडने 4 बळी घेतले.