पिंपरी (प्रतिनिधी) – आयर्नमॅन असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची आज (बुधवारी) विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य या पदावर बदली झाली आहे. कृष्णप्रकाश यांच्या जागी मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 20) रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले.
कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून 5 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला होता. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पावणे दोन वर्षात त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली.
अवैध धंद्याना चाप लावत जुगार, मटका बंद केला. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. तसेच बॅंकांच्या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्याने व्हाईट कॉलर गुन्हेगारांनीही त्यांचा धसका घेतला होता. वेळोवेळी वेषांतर करून त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
तसेच नव्याने येणारे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही सोलापूरचे पोलीस आयुक्त असताना धडाकेबाज कामगिरी करत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.