पालकांना उत्सुकता : करोनामुळे जाहीर कार्यक्रम यंदा नाही
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी आज (मंगळवार) लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीद्वारे आपल्या मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश मिळणार, याची उत्सुकता पालकांना लागली आहे.
‘आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. राज्यातील विविध जिल्ह्यामधून या प्रवेशासाठी 9 हजार 331 शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 487 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. यासाठी एकूण 2 लाख 91 हजार 665 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यात 972 शाळांमध्ये 16 हजार 949 जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासाठी 62 हजार 943 अर्ज दाखल झाले आहेत.
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे या वर्षी प्रवेशाची राज्यस्तरील लॉटरी काढण्यासाठी कोणताही मोठा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत (विद्या प्राधिकरण) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही प्रवेशाची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, प्रशासन अधिकारी शैलजा दराडे, विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक, आदी उपस्थित राहणार आहेत.
अशी पाहता येणार माहिती
लॉटरी लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीत नाव असल्याबाबतचे “एसएमएस’ पालकांना 19 मार्च रोजी दुपारनंतर प्राप्त होणार आहेत. पालकांनी फक्त “एसएमएस’ वर अवलंबून राहू नये. ऍप्लिकेशननुसार “आरटीई’ पोर्टलवर क्लिक करुन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागल्याची माहिती पाहता येणार आहे.