पाबळ (वार्ताहर) – गेले चार महिने “करोना रुग्ण विरहित गाव’ अशी ख्याती झालेल्या पाबळकरांना डॉक्टरच करोना बाधित आढळून आल्याने मोठा धक्का बसला. या घटनेने प्रत्येक नागरिकाला करोना निर्मूलनासाठी, नियमाचे पालन करणे म्हणजे काय, याचाच धडा मिळाला असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
वास्तविक रोगाच्या प्रादुर्भावात सर्वप्रथम वैद्यकीय व्यावसायिक सावध असतात. पाबळ घटनेतील डॉक्टर सुरक्षित रुग्णोपचार करत असतानाही बाधित झाल्याने करोना आता आपल्या घराजवळ आल्याची ग्रामस्थांना तीव्र जाणीव देऊन गेली. सांगूनही दुर्लक्ष करणारे गाव व नागरिक खऱ्या अर्थाने स्वयंभू लॉकडाऊन झाले. काही दिवसांपूर्वी मुंबई, पुणे येथून तब्बल साडेतीन हजारांवर नागरिक पाबळ येथे वास्तव्यास आले होते. त्यावेळी अत्यंत काळजीपूर्व विलगीकरण करून तसेच ग्रामस्थांनी पाहुण्यांना न येण्याची विनंती करून, मोठा धोका टाळण्यात यश मिळवले होते. मात्र शिथिलीकरणाचा घेतलेला गैरअर्थ व गावाबद्दल वाढलेला अतिआत्मविश्वास व त्यामुळे झालेली नजरचूक एका डॉक्टरला बाधित होण्यास कारणीभूत ठरली. यामुळे खडबडून जागे झालेल्या पाबळच्या नागरिकांनी खिशातले रुमाल नाकातोंडावर टाइट बांधायला सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांनी जरा दमानं घ्यायचे ठरवले आहे तर सहज फेरफटका मारणाऱ्यांनी घर गाठले आहे.
करोना वाढत असताना अर्थव्यवस्था सुरू ठेवण्याकडे शासनाचा कल दिसत आहे. याचा सरळ अर्थ आहे, तो म्हणजे करोना संपण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत आपला गाव सुरक्षित ठेवायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागणार असल्याचे भान आले तर हेही कठीण दिवस जाणार आहेत, हे मान्य करावेच लागणार आहे.
पाबळ व परिसरात सर्वेक्षण सुरू असून संपर्कातील आठ हाय रिस्क व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतर व्यक्तींमध्ये विशेष लक्षणे आढळली नाहीत.
-शरद चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्र केंदूर