पिंपरी -कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, विविध भागातील रस्त्यांचे रखडलेले काम, डांबरीकरणाच्या कामांकडे झालेले दुर्लक्ष अशा विविध समस्यांचा पाढा “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडला.
मुख्य समन्वयक अधिकारी तथा उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या नियंत्रणाखाली ही सभा झाली. नागरिकांच्या एकूण 22 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्योतिबानगर, सर्व्हे क्रमांक 73, गट क्रमांक 5 येथील रस्ता, वीज पुरवठा आणि पेव्हींग ब्लॉकची समस्या नारायण बनसोडे यांनी मांडली. शिवराजनगर, रहाटणी भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे येथे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी रॉयल ग्रीन्स फेज सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
पिंपरी कॅम्प, सुभाषनगर येथील रस्त्यावर दिवे लावण्यात यावे, श्रीकृष्णनगर-नखाते वस्ती येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, थेरगाव-तळजाई कॉलनी येथे पेव्हींग ब्लॉक बसविण्यात यावे, रहाटणी परिसरात पथदिवे बसविण्यात यावे, ओपन जिमचे साहित्य दुरुस्त करावे, अशा मागण्या स्थानिकांनी केल्या.