निगडी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सोमवारी सकाळी दहा ते 12 या वेळेत जनसंवाद सभा घेण्यात आली. महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त उल्हास जगताप व क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा झाली. या वेळी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांमधून 27 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात स्थापत्यविषक तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे.
या जनसंवाद सभेला “फ’ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी होते. या जनसंवाद सभेमध्ये 27 नागरिकांनी भाग घेऊन आपल्या समस्या, अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यामध्ये पाणीपुरवठा विभागाशी संबंधित – 04, अतिक्रमण – 04, स्थापत्य विभाग -13, पशू वैद्यकीय -02, उद्यान-03, ड्रेनेज-02, आरौग्य-01, वैद्यकीय – 01 अशा विभागवार समस्या होत्या. या नागरिकांच्या सर्व समस्यांचे समाधान, निराकरण अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी केले.
ज्या विभागात समस्या असेल त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना लगेच सूचना करून समस्येची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे समस्या घेऊन आलेले नागरिक समाधानी होते. जनसंवाद सभा या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. तक्रारींचे निरसनही होत आहे. समस्या निवारण्याची काळजी अधिकारी घेत आहेत. जे जे करणे शक्य आहे ते त्वरित करण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. समस्या घेऊन येणारा नागरिक पहिली समस्या पूर्ण झाल्याचेही आवर्जून सांगत होते. यामुळे क्षेत्रीय कार्यालयानुसार घेण्यात येत असलेली जनसंवाद सभा ही संकल्पना खूप चांगली असल्याचे नागरिक सांगत आहेत.