लोणावळा – विकसित भारत संकल्प यात्रेचा दिवशी आंदोलन करणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांनी बंदी आदेश मोडून काढण्याचा एकाच प्रकारचा गुन्हा केला आहे. मग एका गटाला एक न्याय आणि दुसर्या गटाला दुसरा न्याय असे का? हा प्रश्न उपस्थित करीत महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन गाठले.
शुक्रवारी 5 जानेवारी रोजी लोणावळा शहरात केंद्र सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम रेल्वे इन्स्टिट्यूट येथे सुरू होत असताना अचानक महाविकास आघाडीचे स्थानीक नेते व कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करू लागले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विजयाची घोषणाबाजी करीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली होती.
याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शादान चौधरी, काँग्रेसचे नासिर शेख व इतर 10 ते 12 जणांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3), 135 अव्यये गुन्हा दाखल केला. आम्ही आदेशाचा भंग केला असेल तर आमच्यावर निश्चित गुन्हा दाखल करा पण लोणावळा पोलिसांनी जसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला तसा भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखलकरण्याची मागणी केली.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, पुणे जिल्हा संघटक शादान चौधरी, माजी नगराध्यक्षा उषा चौधरी, राजू गवळी, माजी नगरसेवक नासीर शेख, संध्या खंडेलवाल, माजी शिक्षण मंडळ सभापती जीतूभाऊ कल्याणजी, वसंत भांगरे, पुष्पा भोकसे, राष्ट्रवादी पवार गटाचे विनोद होगले, संतोष कचरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.