नागपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या राज्य व केंद्रात बैठका सुरू असताना काँग्रेसने संपूर्ण राज्यभरातून लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली. इच्छुक उमेदवारांना बुधवार १० जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे. सोमवार ९ पर्यत किती अर्ज आले याची माहिती घेतली असता प्रदेश कार्यालयातच माहिती संकलीत झाली नसल्याचे दिसून आले.
प्रत्येक शहर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ठरवून दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत अर्ज सादर करायचे आहे. नागपूर ग्रामीणसाठी सोमवारी ७ तर शहरासाठी १० अर्ज आले होते. विदर्भाचा कानोसा घेतला असता अर्ज सादर करण्यात अनुत्साह दिसून आला.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकसंध पक्ष होते. मात्र २०२३ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून एकाच पक्षाची दोन शकले झाली. त्यामुळे समीकरणे बदललेली आहे. काँग्रेसमध्ये फूट फडलेली नाही. महायुतीमध्ये नागपुरची जागा भाजपाकडे आहे, तर महाविकास आघाडीमध्ये लाेकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. रामटेक पूर्वीपासून ठाकरे गटाकडे आहे.
आता तिथे शिंदे गटात सहभागी झालेले कृपाल तुमाने खासदार आहे. रामटेकमधून नितीन राऊत यांचे सुपूत्र प्रदेेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ग्रामीणमधून अर्ज केला आहे. २०१९ मध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींविरूद्ध लोकसभा लढवली होती. यावेळेस युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांनीही अर्ज भरला आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला होता.
शहर आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयात अर्ज सादर करायचे असले तरी अनेक जण प्रदेश कार्यालयातही अर्ज सादर करतात. १० तारखेचा एक दिवस झाल्यानंतर नंतर सर्व माहिती संकलित करून माध्यमांना एकत्रितरित्या देण्यात येईल.
– अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस