नवी दिल्ली – इक्वेडोरमद्ये एका वाहिनीवर थेट प्रसारण सुरू असताना काही सशस्क्ष हल्लेखोर स्टुडीओमध्ये घुसून कर्मचार्यांना धमकावायला सुरुवात केली. यामुळे नाट्यमय स्थिनी निर्माण झाली होती. पोलिसांनी या सशस्त्र हल्लेखोरांना अटक केली आहे, असे देशाच्या पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. घुसखोरांकडील बंदुका आणि स्फोटके देखील पोलीस कर्मचार्यांनी जप्त केली असल्याचे पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे. मात्र एकूण किती जणांना अटक केली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. हा एक दहशतवादी हल्लाच होता, असेही पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे.
गुआयालाक्विल शहरामध्ये टेलिमाझोनास नावाच्या वाहिनीच्या स्टुडिओमध्ये हा प्रकार घडला. स्टुडिओमध्ये घुसलेल्या बंदुकधार्यांनी वाहिनीचे कार्यालयच ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी देशाच्या अध्यक्षांनी देशात आणिबाणी लागू झाल्याची घोषणा केली.
हल्लेखोरांच्या हातात पिस्तुल आणि स्फोटकांच्या कांड्या होत्या. स्टुडिओमध्ये घुसताच त्यांनी आपल्याकडे बॉम्ब असल्याची बोंब ठोकली. प्रसारणादरम्यान गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. मात्र कोणी जखमी झाले का नाही, हे समजू शकले नाही.
लॉस चेनोरॉस टोळीचा कुख्यात गुंड अडोल्फो मकास उर्फ फितो तुरुंगातून पळून गेल्याच्या पार्श्वभुमीवर इक्वेडोरमध्ये अनेक पोलीस अधिकार्यांचे अपहरण झाले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणिबाणी लागू केली जाईल, असे अध्यक्ष डॅनिएल नोबोआ सोमवारीच म्हणाले होते. वाहिनीच्या स्टुडिओवर हल्ला झाल्यावर अध्यक्षांनी २० ड्रग तस्कर टोळ्यांना दहशतवादी संघटना घोषित केले. या संघटनांना संपवण्याचे आदेशही अध्यक्षांनी लष्कराला दिले आहेत.