मुंबई – राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणेच पार पडण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच 2024च्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवार निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एक पॅनल तयार करण्याचा विचार करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
महाविकास आघाडीची रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवसस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भाच चर्चा झाल्याची माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी बैठकी पार पडली. यात कर्नाटकाच्या निकालानंतर विरोधकांमध्ये आनंद द्विगुणीत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात पुढची वाटचाल कशी असेल, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार बैठक बोलविली होती.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने लोकसभेच्या 48 जागांचे वाटप, आणि कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे ठरवावे आणि त्याचबरोबर 288 विधासभेच्या जागांची देखील चर्चा झाली. कारण, लोकसभेबरोबर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील अशा चर्चा आहेत.
त्यामुळे एकत्र निवडणुका लागल्या धावपळ नको म्हणून महाविकास आघाडीने आधीच तयारी केलेली बरी, अशा पद्धतीने बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणूकीत 48 जागांपैकी सर्वाधिक 23 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्या खालोखाल तत्कालीन शिवसेनेची संख्या 18 होती. तसेच राष्ट्रवादीने 4, तर कॉंग्रेसला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले होते.
जागा वाटपासाठी समिती नेमणार !
जागावाटपासाठी काही फॉर्मुला ठरवला आहे का? किंवा यासाठी समिती स्थापना करण्याचा निर्णय बैठकीत झाला का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, जागांसाठी प्रत्येक पक्षाकडून नावे येतील, महाविकास आघाडीशी संबंधित असणारे जे मित्रपक्ष आहेत.
त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे. त्यांना बरोबर घ्यावे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस प्रत्येकी 2 दोन नेते बसून 48 जागांच्या वाटपाची चर्चा होईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली.