पाटणा -बिहार विधान परिषद निवडणुकीसाठी राजदने शुक्रवारी ४ उमेदवार निश्चित केले. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्या पुन्हा विधान परिषद सदस्या बनण्यास सज्ज होणार आहेत. बिहार विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
त्यामध्ये लालूंच्या पत्नी राबडी, उर्मिला ठाकूर, अब्दुल बारी सिद्दीकी आणि सैद फैसल अली यांचा समावेश आहे. सीपीआय(एमएल) या मित्रपक्षाच्या एका उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णयही राजदने घेतला.
बिहारमधील सत्तारूढ एनडीएच्या ३ उमेदवारांनी याआधीच अर्ज दाखल केले. त्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही समावेश आहे. एनडीएचा घटक असणारा भाजप ३ उमेदवार देणार असल्याचे समजते. त्यामुळे ११ जागांसाठी तितकेच उमेदवार रिंगणात असतील.
तसे झाल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत ताकद वाया घालवण्याच्या मूडमध्ये राजकीय पक्ष नसल्याचे समजते.