Lok Sabha Election 2024 । कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत साथ देण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतेच येथे जाहीर केले. गीता गवळी या मला बहिणीप्रमाणे असून अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना मीही प्रेम देईन. मी आता अखिल भारतीय सेनेतील एक सदस्य झालो असल्याचे समजावे, असे वक्तव्य नार्वेकर यांनी केले आहे.
नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासू मी न्यायालयात वकिली करतोय. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे, यापुढेही तुमच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळत राहिल. आखिल भारतीय सेनेची साथ मी कधीही सोडणार नाही. या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीता गवळी आणि अरूण गवळींकडून मिळाले आहे तेच प्रेम माझ्याकडून मिळणार. आखिल भारतीय सेनेच्या परिवारामध्ये आज एक नवीन सदस्य जोडला गेला आहे. आमच्या बहिणीला या भावाची साथ फक्त लोकसभेपुरती नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत आम्ही देत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याची मोठी मुलगी गीता गवळी 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत अभासेतर्फे निवडून आलेली एकमेव नगरसेविका होती. 2017 च्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपमध्ये फाटाफूट झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. गीता गवळींना गळाला लावण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांनी केले होते, परंतु त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
गवळींना मानणारा मोठा वर्ग
दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरूण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती सरकारने अरूण गवळीच्या सुटकेचा आदेश काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला 92 हजार मते मिळाली होती. त्यावेळी सचिन अहिर आणि अरुण गवळी यांना मिळालेल्या मतांचा आकडा हा निवडून आलेल्या सेनेच्या मोहन रावले यांच्या मतांच्या आकड्यापेक्षा जास्त होता.