रोम – इटालीने देशातील लॉकडाऊनचा कालावधी 12 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. त्या देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 11 हजार 591 इतकी झाली आहे. तर इटालीतील करोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर गेली आहे. देशाची सध्याची परिस्थिती पाहता अचानक सारे निर्बंध उठवता येणार नाही तथापि टप्प्याटप्प्याने ते कमी केले जाणार आहेत, असे इटालीच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. इटालीने या आधी जे निर्बंध घातले होते त्याची मुदत येत्या शुक्रवारी संपत होती.
दरम्यान देशातील या रोगाची लागण होण्याचे प्रमाण आता हळूहळू घटताना दिसत आहे असेही इटालीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही घट सुमारे 4.1 टक्का इतकी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. करोनाग्रस्त बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाणही सध्या सुधारते आहे असे त्यांनी म्हटले असून गेल्या चोवीस तासात 1590 लोक बरे होऊन परत गेल्याचेही त्यांनी सांगितले.