हाडांशी निगडित कोणतीही समस्या उद्भवली की आपण अगदी सहज हाडांच्या डॉक्टरकडे जातो, पण त्याबरोबरच फिजिओथेरपी हाही हाडांच्या समस्यांसाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. हल्ली हाडांशी निगडित शस्त्रक्रिया किंवा इतर समस्या उद्भवल्या की डॉक्टरही फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला घेतात.
यामध्ये कोणतेही औषध न देता केवळ व्यायाम आणि काही उपकरणांच्या साह्याने रुग्णाला आराम मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. हे व्यायाम सुरुवातीला तज्ज्ञांकडून शिकवले जातात. मात्र, अनेकदा ते व्यायाम घरच्या घरीही करता येऊ शकतात. त्यामध्ये सातत्य ठेवल्यास त्याचा हाडांच्या समस्यांवर अतिशय चांगला उपयोग होतो. अशाच फिजिओथेरपीमधील काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी जाणून घेऊया…
अपंगत्व, मानदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पायाचे दुखणे, गुडघेदुखी अशा अनेक गोष्टींवर फिजिओथेरपी हा उत्तम उपाय होऊ शकतो.
इलेक्ट्रिक उपकरणं स्नायूंना आराम अथवा उत्तेजना मिळण्यासाठी, चालना मिळण्यासाठी, जखमा बऱ्या होण्यासाठी किंवा दुखणे कमी होण्यासाठी उपयुक्त असतात. यात अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, टेन्स, आय.एफ.टी., ट्रॅक्शन, लेजर, इंफ्रा रेड, विविध करंट ह्यांचा उपयोग केला जातो.
मॅन्युअल थेरेपी, निडलिंग, न्युरो टेकनिक आणि टेपिंग या अत्याधुनिक उपचारपद्धती आहेत. ज्यामध्ये फिजिओथेरेपिस्ट त्यांच्या हातांचा, सुईचा, टेपचा आणि इतर उपकरणांचा वापर करून स्नायूंना आणि सांध्यांना चालना देऊ शकतात. तसेच या उपचारपद्धतींनी ताठरलेल्या स्नायूंना आणि मासपेशींनासुद्धा चालना देता येते.
फिजिओथेरपी ही पॅरालिसिस नंतरचे उपचार, हाडांशी निगडित मोठा अपघात, मेंदूशी निगडित आजार यानंतर अतिशय उपयुक्त ठरणारी एक उत्तम उपचारपद्धती आहे. मात्र, याबाबत आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्याने त्याचा म्हणावा तितका वापर केला जात नाही.
मात्र ही उपचारपद्धती तज्ज्ञांकडून समजावून घेऊन मगच करणे केव्हाही श्रेयस्कर असते. केवळ व्यायाम आहेत म्हणून अपुऱ्या ज्ञानावर ते केल्यास त्याचा शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो.
दुखावलेले स्नायू, सांधे यांची काळजी घेण्याचे काम फिजिओथेरपीमध्ये केले जात असल्याने खेळाडूंना झालेल्या दुखापतींवरही ही उपचारपद्धती अतिशय उपयुक्त ठरते.
फिजिओथेरपी म्हणजे केवळ व्यायाम असा गैरसमज अनेकदा दिसतो. मात्र तसे नसून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य पद्धतीने केलेल्या हालचालींना फिजिओथेरपीमध्ये विशेष महत्त्व असते. यामध्ये रुग्णाची विशिष्ट समस्या लक्षात घेऊन त्यानुसार फिजिओथेरपीस्ट व्यायामाविषयीचे मार्गदर्शन करतात.