सातारा – सातारा जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात 17 जुलैपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये दि. 17 जुलै ते 22 जुलै या कालावधीत पूर्णतः तर दि. 22 ते 26 जुलै या काळात अंशतः लॉकडाऊन राहणार आहे. या आदेशास जिल्हावासियांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे..
पूर्णतः बंद व अंशतः सुरू
सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांची दुकाने दि. 17 ते दि. 22 जुलैपर्यंत संपूर्णत: बंद. दि. 22 ते दि. 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दु. 2 पर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद.
वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मद्याची घरपोच सेवा दि. 17 ते दि. 22 जुलैपर्यंत संपूर्णत: बंद राहतील. दि. 22 ते दि. 26 जुलै या कालावधीत फक्त घरपोच सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी.
झोमॅटो, स्वॅगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यांचे मार्फत देण्यात येणारी घरपोच सेवा दि. 17 ते 22 जुलैपर्यंत पूर्णत: बंद. दि. 22 ते दि. 26 जुलै या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील.
सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले ही सर्व ठिकाणे दि. 17 ते दि. 22 जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहतील. दि. 22 ते दि. 26 जुलै या कालावधीत केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार सकाळी 9 ते दु. 2 या कालावधीत सुरू राहतील.
मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री दि. 17 ते दि. 22 जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहतील.
दि. 22.07/2020 ते दि. 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व परवानगी घेऊन सुरू असलेल्या उद्योगातील अधिकृत कर्मचाऱ्यांसाठी परवानगी. तसेच अत्यावश्यक वस्तूंचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतूक या आदेशातून वगळली आहे.
इ- कॉमर्स, ऍमेझॉन यासारख्या तत्सम सेवा दि. 17 ते दि. 22 जुलैपर्यंत पूर्णतः बंद. दि. 22 ते दि. 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यत सुरू राहतील.
पूर्णतः बंद
उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (शिवभोजन थाळी, वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स स्टाफ नर्स साठी यांचे निवासकामी असलेली हॉटेल, इन्स्टिटयुशनल कॉरंटाईन साठी घेतलेले हॉटेल व इतर इमारती वगळून) रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपूर्णत: बंद.
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे पूर्णत: बंद. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करण्यास प्रतिबंध.
सर्व केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुकाने पूर्णतः बंद.
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णतः बंद.
सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी पूर्णत: बंद राहतील. तथापि, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाण्या येण्याकरिता व वैद्यकीय कारणास्ताव प्रवासासाठी खासगी वाहनाच्या वापरास परवानगी.
सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह पूर्णतः बंद.
सर्व प्रकारची खासगी बांधकामे पूर्णतः बंद. तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासकीय कामे सुरू राहतील.
सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ पूर्णतः बंद. मात्र, दि. 14 जुलैपूर्वी परवानगी घेण्यात आलेले खासगी जागेतील व मंगल कार्यालयातील लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील.
सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा पूर्णतः बंद.
धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तीकरिता बंद. तथापि, सर्व धार्मिक स्थळ, सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
==================