कराड -येथील शाहू चौकातील दोन दुकानांना सोमवार दि. 13 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांसह नागरिकांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, शार्ट सर्कीटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
शाहू चौकात धन्यकुमार ऍन्ड बदर्स व श्रीफळ ट्रेडिंग कंपनी ही दोनही दुकाने शहा बंधूंची दुकाने आहेत. या नारळ व मोबाईल शॉपी दुकानाला सोमवारी रात्री उशिरा आग लागली. आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास दुकानातून धूर येऊ लागला. त्यामुळे शेजारील दुकानाचे मालक व काही नागरीकांनी याची कल्पना संबंधित दुकानांचे मालक शहा बंधुंना दिली.
दुकानचे मालकही त्वरीत शाहू चौकात पोचले. त्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा पसरल्याने आगीने दुकान व्यापले. तेथे त्वरीत पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. तोपर्यंत दुकानातील बराचसा भाग जळून खाक झाला.
श्रीफळ ट्रेडिंग कंपनी या दुकानातून चिमनलाल शहा यांचा होससेल नारळ व्यापार चालत होता. दुकानात असलेला 30 हजार रूपये किंमतीचा 40 पोती नारळ व इतर साहित्य जळून खाक झाले.
धन्यकुमार ऍन्ड ब्रदर्स या दुकानातून धन्यकुमार शहा यांचा बारदान विक्रीसह मोबाईल ऍक्सेसरीज व दुरूस्ती व्यवसाय केला जात होता. या आगीत 10 हजार रूपये किंमतीचे बारदान, मोबाईल ऍक्सेसरीज स्टॉक – 3 लाख 50 हजार रूपये, दुरूस्तीसाठी आलेले 1 लाख रूपये किंमतीचे मोबाईल, लाकडी फर्निचर व पार्टीशन 2 लाख रूपये, विक्रीसाठी आणलेले पाणी बॉटलचे बॉक्स 10 हजार रूपये.
फ्रीज 20 हजार रूपये, झेरॉक्स मशिन 1 लाख रूपये, सीसीटीव्ही सेट 17 हजार रूपये, कॉम्प्युटर सेट 30 हजार रूपये, दुकानातील वायरींग 30 हजार रूपये, लोखंडी शटर 25 हजार रूपये असे एकूण 8 लाख 92 हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा तलाठी संजय जंगम यांनी केला.
पालकमंत्र्यांकडून पाहणी
शाहू चौकातील धन्यकुमार ऍन्ड बद्रर्स व श्रीफळ ड्रेडिंग कंपनी या नारळ दुकानास मध्यरात्री अचानक आग लागली लागली होती. त्यामुळे दुकानांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी मंगळवारी सकाळी 8 वा. भेट देऊन पाहणी केली. नुकसानीबाबत दुकानांचे मालक धन्यकुमार अंबालाल शहा व चिमनलाल अंबालाल शहा यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाकडून योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.