मंचर-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने सोनेतारण, कृषीकर्ज यांसारख्या योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. येथील 15 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाकरीता पिकअप वाहनासह कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती शाखाधिकारी सागर तुरे यांनी दिली.
अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, निरगुडसर, टाव्हरेवाडी आदी गावांसाठी अवसरी खुर्द गावात गेली 50 वर्षापासून बॅंक ऑफ बडोदा ही सहकारी बॅंक आहे. या शाखेच्या वतीने पंधरा वर्षापूर्वी गाईगोठा आणि उद्योग व्यवसायाकरीता मर्यादित कर्जपुरवठा केला जात होता. या शाखेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी वाढल्याने शाखेच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पिकअप, कारलोन, गृहकर्ज, सोनेतारण, कृषीकर्ज वाटप सुरु आहे. कृषीकर्ज आणि सोनेतारण कर्ज या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक गावात शाखेच्या वतीने कृषीमेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे शाखाधिकारी सागर तुरे यांनी यावेळी सांगितले.अवसरी खुर्द येथील सुशिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायाकरिता पिकअप गाडीचे वितरण करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी सागर तुरे, अधिकारी अनिल कुशराम यांनी विठ्ठल भोर यांना गाडीची चावी प्रदान केली.