मुंबई – शुभमन गिल, मॅथ्यू वेड व विजय शंकर यांनी निराशा केल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर यांना साथीला घेत गुजरात टायटन्सला 20 षटकांत 4 बाद 192 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत गुजरातला पहिल्यांदा फलंदाजी दिली. भरात असलेले सलामीवीर गिल व वेड यांना स्वस्तात बाद करत राजस्थानने थाटात सुरुवात केली. त्यानंतर फलंदाजीत बढती देण्यात आलेला विजय शंकर साफ अपयशी ठरला. यावेळी त्यांची स्थिती अशी बिकट बनली होती. त्यावेळी कर्णधार पंड्याने वादळी फलंदाजी करत अभिनव मनोहरच्या साथीत संघाचा डाव सावरला व संघाचे शतक फलकावर लावले.
मनोहर चांगला खेळत असताना 28 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 43 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मिलरने पंड्याला सुरेख साथ दिली. दरम्यान, पंड्याने आपले अर्धशतक पूर्ण करत धावांचा वेग वाढवला. मिलरसह त्याने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाला 20 षटकांत 4 बाद 192 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
पंड्या आपले शतक मात्र षटके संपल्यामुळे पूर्ण करू शकला नाही. त्याने आपल्या नाबाद 87 धावांच्या खेळीत 52 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 4 षटकार फटकावले. मिलरने नाबाद 31 धावा करताना केवळ 14 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. राजस्थानकडून रियान पराग, यजुवेंद्र चहल व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
गुजरात टायटन्स – 20 षटकांत 4 बाद 192 धावा. (अभिनव मनोहर 43, हार्दिक पंड्या नाबाद 87, डेव्हिड मिलर नाबाद 31, रियान पराग 1-12, यजुवेंद्र चहल 1-32, कुलदीप सेन 1-51).