गुणवत्ता असेल तर कोणीही आड येऊ शकत नाही, असे म्हणतात ते कुलदीप सेनच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे. वडिलांचे सलूनचे दुकान असल्यामुळे हा मुलगा क्रिकेटमध्ये काय करू शकेल असा प्रश्न विचारणारेच आता त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी करत आहेत हे कुलदीपच्या गुणवत्तेचेच यश आहे.
कुलदीप यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थानकडून खेळत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात खेळपट्टीवर भरात असलेला मार्कस स्टोनिस फलंदाजी करतअसूनही कुलदीपने टाकलेले ते अखेरचे षटक आपण सगळ्यांनीच पाहिले. त्याने ज्या आत्मविश्वासाने या षटकात गोलंदाजी केली ती पाहता त्याच्याकडे मोठा गोलंदाजा बनण्याची क्षमता आहे हे तर दिसून आले.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कुलदीपने कर्णधार संजू सॅमसन याने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. या षटकापूर्वी स्टोनिसने हा सामना लखनौच्या आवाक्यात आणला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी जेव्हा कुलदीप आला तेव्हा हा सामना घालवणार असाच विचार अनेकांच्या मनात आला होता. मात्र, त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला व राजस्थानला हा थरारक विजय मिळवून दिला. आयपीएल स्पर्धेचे हेच यश आहे की शहरी भागांतील खेळाडूंच्या बरोबरीने आपण कुठेही कमी नाही हेच सिद्ध करत दुर्गम गावातून आलेले खेळाडू ही स्पर्धा गाजवत आहेत.
कुलदीपला परिसस्पर्श लाभला तो श्रीलंकेचा धडकी भरवणारा एकेकाळचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याचा. मुंबई इंडियन्सशी जोडला गेलेला मलिंगा यंदाच्या मोसमात राजस्थानशी करारबद्ध झाला व या पहिल्याच स्पर्धेत त्याने कुलदीपच्या रूपाने मॅचविनर गोलंदाज राजस्थानला दिला. कुलदीपने टाकलेल्या त्या अखेरच्या षटकानंतर खुद्द मलिंगाही टाळ्या वाजवत कुलदीपचे अभिनंदन करताना दिसला.
कुलदीप हा मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातील होतकरू क्रिकेटपटू की ज्याने आयपीएल स्पर्धाच नव्हे तर देशाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले. घरची प्रचंड गरिबी. वडिलांचे सलूनचे दुकान मात्र, असे चित्र असूनही त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रेमाला प्रोत्साहन दिले. मुलाच्या क्रिकेटच्या छंदावर खर्च करण्याची परिस्थिती नसतानाही त्यांनी मुलाचा हिरमोड केला नाही व शक्य ती सर्व मदत केली व आज कुलदीप ज्या स्तरावर यश मिळवत आहे ते केवळ त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीमुळेच.
रेवा क्रिकेट अकादमीने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतले व त्याला क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण दिले. वयोगटातील स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सिद्ध करत तो मध्य प्रदेशकडून रणजी करंडक स्पर्धा खेळला. त्यात 14 सामने खेळताना त्याने 43 बळी मिळवले व सगळ्याच समीक्षकांना आश्चर्याचा धक्काही दिला.
एका रणजी सामन्यात राजस्थानच्या प्रशिक्षकांनी कुलदीपची गोलंदाजीतील गुणवत्ता पाहिली व यंदाच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात त्याची बेसप्राईज 20 लाख असूनही त्याला राजस्थानच्या संघात खरेदी केले. यंदाच्या मोसमात रविवारी त्याने लखनौविरुद्धच्या सामन्याद्वारे आयपीएल स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळला व अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय देखील मिळवून दिला. आता पुढील काळात तो आपल्या गुणवत्तेची साक्ष आयपीएलसह देशाकडून खेळतानाही देण्यात यशस्वी होणार का याचीच उत्कंठा लागली आहे.