नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने देशातील आघाडीच्या सहेतुक कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना बॅंकेने सहेतूक कर्जबुडव्यांची नावे जाहीर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेला सहेतूक कर्जबुडव्यांची नावे जाहीर करण्याचे आदेश दिले होते. “द वायर’ने माहिती अधिकारांतर्गत मे महिन्यात या संदर्भात प्रश्न विचारला होता.
हे आहेत “विलफुल डिफॉल्टर्स…
कर्जदाराचे नाव (थकित रक्कम रु.)
गीतांजली जेम्स (5044 कोटी), आरआयई ऍग्रो लिमिटेड (4197 कोटी) विन्सम डायमंड्स (3386 कोटी), रुची सोया 3225 कोटी), रोटोमॅक ग्लोबल (2844 कोटी), किंगफिशर एअरलाइन्स (2488 कोटी), कुडोस कॅमी लि. (2326 कोटी), झूम डेव्हलपर्स (2024 कोटी), डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज (1951कोटी), एबीजी शिपयार्ड (1875 कोटी), फॉरेव्हर प्रीशियस ज्वेलरी (1718 कोटी), सूर्या विनायक इंडस्ट्रीज (1628 कोटी), एस कुमार्स लिमिटेड (1581 कोटी), गिली इंडिया लिमिटेड (1447 कोटी), सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स (1349 कोटी), गुप्ता कोल इंडिया (1349 कोटी), व्हीएमसी सिस्टीम्स (1314 कोटी), नक्षत्र ब्रॅण्ड्स (1314 कोटी), इंडियन टेक्नोमॅक (1091 कोटी), श्री गणेश ज्वेलरी (1085 कोटी), जैन इन्फ्राप्रोजेक्ट्स (1076 कोटी), सूर्या फार्मास्युटिकल्स (1065 कोटी), नाकोडा लिमिटेड (1028 कोटी), केएस ऑइल लिमिटेड (1026 कोटी), कोस्टल प्रोजेक्ट्स (984 कोटी), हनूग टॉइज (949 कोटी), फर्स्ट लीजिंग कंपनी (929 कोटी), कॉनकास्ट स्टील (888 कोटी), ऍक्शन इस्पात (888 कोटी), डायमंड पॉवर (869 कोटी).
रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या 30 सहेतुक कर्जबुडव्यांनी मिळून विविध वित्तीय संस्थांना 50 हजार कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या यादीमध्ये देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरलेला गीतांजली जेम्सचा सर्वेसर्वा मेहुल चोक्सी अव्वलस्थानी आहे. गीतांजली जेम्सने विविध वित्तीय संस्थांचे 5044 कोटी रुपये बुडवले आहेत.
यादीत चोक्सीच्या गीतांजली जेम्स व्यतिरिक्त अन्य दोन कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत एकेकाळी पेन उद्योगात दबदबा निर्माण करणाऱ्या रोटोमॅकचाही समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार थकीत रकमेमध्ये बॅंकांनी वेळोवेळी “राईट ऑफ’ केलेल्या रकमेचाही समावेश आहे. ही यादी सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्सद्वारे मिळालेल्या आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.
कर्ज घेऊनही जाणीवपूर्वक त्याची परतफेड न करणाऱ्या व्यक्तीस सहेतूक कर्जबुडवे असे म्हटले जाते. थोडक्यात कर्ज चुकविण्याची पात्रता असूनही ते फेडण्याची इच्छा नसणाऱ्या व्यक्तींना सहेतुक कर्जबुडवे असे म्हटले जाते.