भोरचे तहसीलदार अजित पाटील यांचे आवाहन
कापूरहोळ- महाराष्ट्र सरकारच्या 27 डिसेंबर 19 च्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 ला दोन लाखांपर्यंत कर्जदार शेतकऱ्यांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला असून, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे.
या योजनेची अंमलबजावणी तालुक्यात सुरू असून शेतकऱ्यांचे आधार कार्ड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच बॅंक शाखेकडे असणे आवश्यक आहे. ज्याचे आधार लिंक नसणार त्यांची यादी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, बॅंक शाखा आणि तहसील कार्यालय, तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मर्यादित भोर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कर्ज माही योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड आपल्या बॅंक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड उपलब्ध असतील त्यांनी सचिव सेवा सहकारी संस्था अथवा संबंधित बॅंकेत शाखेस सादर करावे. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधारकार्ड उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.