नवी दिल्ली: करोनाग्रस्त रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील उपचारासाठी अव्वाच्यासव्वा दरात खर्च वसूल केला जातो. सध्याच्या अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही त्यामुळे रुग्णालयांवर करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चावर मर्यादा लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारचे म्हणणे मागवले आहे.
या याचिकेची एक प्रत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सादर करण्यात यावी आणि त्यावर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका जाणून ती माहिती आठवडाभराच्या अवधीत कोर्टात सादर करावी, अशी सूचनाही कोर्टाने त्यांना केली आहे. अविषेक गोयंका यांनी ही याचिका दाखल केली आहे.
करोनाग्रस्तांवर सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये एक समान दराने उपचार सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात खासगी रुग्णालये आयुष्यमान भारत योजनेच्या दरात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यास तयार आहेत काय, अशीही विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे.