वडूज – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढणाऱ्या खटाव तालुक्यातील महिलेला आणि तिच्या प्रियकराला जिल्हा न्यायलायाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की स्वाती ब्रह्मदेव तुपे (वय 31, रा. तुपेवाडी, ता. खटाव) व तिचा प्रियकर धनाजी शिवाजी काटकर (रा. मानेवाडी ता. खटाव) यांचे अनैतिक संबंध होते. स्वाती तुपे हिच्या घरी धनाजी कटकर वारंवार जात येत होता. त्याबाबत स्वातीच्या घरातील लोकांनी धनाजी यास समजावून सांगण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला. स्वातीचा नाद सोडण्यास सांगितले.
मात्र, त्या दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. याउलट मृत बह्मदेव यास त्याच्यावर खोटी केस करण्याची धमकी देत होते. मानेवाडीचा माजी सरपंच असल्याने धनाजीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे तो कोणाकडेही लक्ष देत नव्हता. दोघांच्या अनैतिक संबंधास स्वातीचा पती ब्रह्मदेवचा विरोध होता. या कारणावरून स्वाती आणि धनाजी हे दोघे ब्रह्मदेववर चिडून होते. धनाजी दि. 3 जून 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास स्वातीला भेटण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी स्वाती, ब्रह्मदेव व धनाजी तसेच त्यांच्या शेजारी राहणारे लोक घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक गारांचा जोरदार पाऊस सुरु झाला.
त्यामुळे स्वाती, ब्रह्मदेव व धनाजी घरात बसले. व स्वातीने दारास कडी लावून घेतली. त्यांनतर सायंकाळी 7.15 च्या सुमारास पाऊस थांबल्याने स्वाती व धनाजी घराबाहेर येऊन आरडाओरडा करून बह्मदेवने गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव केला. त्यावेळी शेजारी राहणारा ब्रह्मदेवचा भाऊ सुनील तसेच त्याचे आई-वडील व शेजारी सुदाम लावंड यांनी घरात पाहिले असता बह्मदेव जमिनीवर उताणा स्थितीत मृत झालेला दिसला. त्यावेळी डॉक्टरला घेऊन येतो म्हणून धनाजी निघून गेला. तो पुन्हा परत आला नाही.
त्याबाबत मृताचा भाऊ सुनील याने वडूज पोलिस ठाण्यात स्वाती तुपे व तिचा प्रियकर धनाजी यांच्याविरूद्ध स्वाती व तिचा प्रियकर धनाजी यांच्या अनैतिक संबंधास विरोध करत असल्याने ब्रह्मदेवचा टेलिफोन वायरने गळा आवळून खून केल्याबाबत तक्रार दाखल केली.या गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एम. जाधव यांनी केला. त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. आरोपींविरुध्द वडूज जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील ए. पी. कदम- साबळे यांनी काम पाहिले.
यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवले. आरोपी स्वाती हिला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तर धनाजी काटकर यालो जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद याप्रमाणे शिक्षा सुनावली. या कामी सरकारी वकीलांना प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे अंमलदार पो. कॉ. सागर सजगणे आणि एएसआय दत्तात्रय जाधव, हवालदार श्रीमती दडस, पो. कॉ. जयवंत शिंदे व अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.