पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्याने बांबुने डोक्यात मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
जनार्दन शंकर अडसुळ (वय 33, रा. कासेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. रोशन (पुणे नाव माहित नाही) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.20 च्या सुमारास सेवनलव चौकाकडून रामोशी गेटकडे जाणाऱ्या नेहरू रस्त्यावर घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले.
खडक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व्हि.डी.केसकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी सहायक फौजदार धिमधिमे, पोलीस नाईक डोंगर आणि हवालदार संतोष शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. मयत रोशन आणि आरोपी अडसुळ ओळखीचे होते.
अडसुळने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, रोशनने त्यास नकार दिला. त्यामुळे बांबुने डोक्यात मारून रोशन याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. नामदेव तरळगट्टी यांनी केली.