महत्त्वपूर्ण पदांवर स्थानिक अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावे!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंपरी – अलिकडेच स्थापत्य विभागाच्या अधीक्षक अभियंता पदी शासनाकडून आलेल्या अ.मा.भालकर यांची नियुक्‍ती करण्यात आली. हे अत्यंत महत्त्वाचे पद असून या पदावर शहराची व विकास आराखड्याची पूर्ण माहिती असणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्‍ती होणे आवश्‍यक आहे. यामुळे या पदावर स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्‍ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भोंडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर हे सुनियोजित शहर असून इतर शहरांच्या तुलनेत शहराचा विकास अधिक आहे. महापालिकेत नियुक्‍त असणारे अधिकारी आणि अभियंते यांच्या अभ्यासू नियोजनामुळे हे शक्‍य झाले आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावर स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्‍ती होणे आवश्‍यक आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा शहराच्या विकासासाठी उपयोग होऊ शकतो. भालकर यांची नुकतीच अधीक्षक अभियंता पदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे. शासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्‍तीमुळे शहर विकासाला बाधा येण्याची दाट शक्‍यता आहे. नवीन अधिकाऱ्याला शहराच्या विकास आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक महिन्याचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे विकासाची सद्य परिस्थितीत असणारी गती कमी होऊन विकास थांबण्याची शक्‍यता अहो. त्यामुळे अधीक्षक अभियंता पदावर महापालिकेतील सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्याचीच नियुक्‍ती करण्यात यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.